Click here to go back
लहानपण दे गा देवा!
Image of a calender
Nov 16, 2021
Logo of a Customer
सानिया पेंढारी
Image of a man working on his laptop

लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥

ह्या ओळी संत तुकाराम ह्यांनी रचलेल्या एका प्रसिद्ध अभंगामधील आहेत. संत तुकाराम महाराज या अभंगात देवाला विनंती करीत आहेत की "हे देवा, या जगातील सर्वात लहान व्यक्तीपेक्षा पण मला लहान कर. मला तू लहानपण दे." बालपण हे व्यक्तीच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर काळ असतो. या वेळेत घडलेल्या गोष्टी आपल्याला घडवतात. आपल्या लहानपणीच्या घटना आपल्याला जीवनभर स्मरण राहतात. लहानपणीचा काळ एक्दम निश्चिन्त असतो. घर, खेळ आणि शाळा असा साधा सरळ विश्व असतं.

भारतामध्ये १४ नोव्हेंबर हा दिवस 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते. त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हटले जायचे. लहान मुले पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जीव की प्राण होते. नेहरूंची इच्छा होती की मुलांना सर्वांगीण शिक्षण द्यावे व भविष्यात एक चांगला समाज घडवावा. त्यांच्या मते मुले ही राष्ट्राची खरी ताकद आणि समाजाचा पाया आहेत. जागतिक बालदिन २० नोव्हेंबर ला साजरा होतो. जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर, त्यांचा जन्मदिवस भारतात बालदिन म्हणून साजरा करण्यासाठी निवडण्यात आला.

लहान मुलांना सगळ्याच गोष्टी मनोरंजक वाटतात. त्यांचा आनंद छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये लपलेला असतो. रोज संध्याकाळी मित्र-मैत्रिणींशी खेळायला जायची आतुरता मला अजूनही आठवते. पूर्ण कॉलोनीमध्ये लपा-छुपी खेळणे किंवा लगोरीचा खेळ मांडणे हे आमचे आवडीचे काम होते. उन्हाळ्याचा सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला राहायला जायची मजा वेगळीच होती. "झुक् झुक् झुक् झुक् अगीनगाडी धुरांच्या रेघा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया" ह्या ओळी तर आपण सगळ्यांनीच ऐकलं असतील. झुक् झुक् गाडी, चॉकलेटचा बांगला, सांग सांग भोलानाथ हे बालगीत माझ्या लहानपणीचे लाडके गीत होते. शाळेच्या सहलींमध्ये किंवा सांस्कृतिक कार्यक्रमातील हे आवडीचे गाणे. रोज सकाळी पेपरमध्ये चिंटूचे नवीन कॉमिक वाचायची आतुरता मला कायम लक्षात राहील. श्रावणाच्या पहिल्या पावसात चिंब भिजायचे वेड आणि उन्ह्याळ्यात आंबा खायची उत्सुकता अतुलनीय होती.

बालपण हा खरोखर खूप सुंदर काळ असतो. लहान असताना आपण संपूर्ण जगाकडे एका निरागस नजरेने पाहतो. जनुकी आकाशातले तारे फक्त आपल्यासाठी चमकतात व पावसाचा पाणी फक्त आपल्यासाठी वाहत असते. आपण मोठे होत जातो आणि ती निरागसता कुठे तरी हरवत जाते. लहान असताना आपल्याला लवकर लवकर मोठे व्हावेसे वाटत. परंतु मोठे झाल्यावरच समजत की मोठेपणाच्या जवाबदार व चिंताग्रस्त जीवनापेक्षा लहानपणीचे निष्पाप आणि चिंतारहित जीवन किती अनमोल होते. लहान मुलांना जपणारा हा दिवस आपण सगळ्यांनीच साजरा करायला हवा. सर्वांना युवा मराठी तर्फे बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !